नाशिक (प्रतिनिधी) : निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले असून हंगामाच्या सुरवातीपासूनच पाऊस, अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. त्यातच गेल्या पाच दिवसात झालेला बेमोसमी पाऊस आणि गारपीट यामुळे ८८८ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात जवळपास दोन हजार क्विंटल द्राक्षांना तडे गेले असल्याने द्राक्षांचे दर किलोमागे २० रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे. रशिया – युक्रेन युद्धामुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम झालेला असतानाच राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळेही शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात तालुकानिहाय द्राक्षांमध्ये सर्वात जास्त नुकसान निफाड तालुक्यात झाले आहे.

द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असताना मागील आठवड्यात मंगळवार ते शुक्रवार या चार दिवसांत जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यांमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तडे गेलेल्या द्राक्षांना बाजारात मागणी नसल्याने शेतकऱ्यांना बेदाणा उत्पादकांकडे धाव घ्यावी लागत असून दराबाबतही चौकशी वाढली आहे. सध्या बेदाण्यासाठी लागणारे द्राक्षमणी ७ ते १० रुपये तर द्राक्ष घड हे १२ ते १५ रुपये किलो दराने विक्री होत आहेत. तडे जाण्याचे प्रमाण अधिक राहिले आणि बेदाणा उत्पादन वाढले, तर बेदाणा दरावर देखील परिणाम होण्याची शक्यता बेदाणा उत्पादकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात अद्यापही ४० ते ५० टक्के द्राक्षबागा काढणीच्या प्रतीक्षेत आहेत. दिंडोरीतील दिंडोरी १३०.००, नाशिक ५३.४४, सिन्नर ४.३०, येवला ०.६०, सटाणा ०.८० असे एकूण ८८८.७४ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. चाचडगाव , निगडोळ , निळवंडी तर निफाड तालुक्यात कोळगाव येथे द्राक्षबागा पडल्या आहेत , तसेच इतर तालुक्यांत जोरदार पावसाने द्राक्ष मण्यांना तडे जात आहेत. निफाड तालुक्यात सर्वाधिक ७०० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. तर शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसात दिंडोरीत ७२ व नाशिक तालुक्यात ५१ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षांचे नुकसान झाले आहे. सध्या चांगल्या प्रतीची द्राक्ष ३० ते ४० रुपये किलो आहेत. उष्णता वाढल्यानंतर द्राक्षांत गोडवा उतरुन ग्राहकांकडून मागणी वाढते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक सध्या उन्हाची तीव्रता वाढण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!