अंबाजोगाई – ऐन दिवाळीत अंबाजोगाई शहरातील ११ रस्त्यांसाठी ९५ कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्यानंतर आणखी चार रस्त्यांसाठी आ. नमिता मुंदडा यांनी १० कोटी रुपयांच्या निधीसाठी मंजुरी मिळवली असून हे सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे होणार आहेत. दोन दिवसापूर्वीच खा. प्रीतम मुंडे यांच्या माध्यमातून आ. मुंदडा यांनी केज मतदार संघातील चार रस्त्यांसाठी १८ कोटींचा निधी आणला होता. त्यापाठोपाठ अंबाजोगाई शहरासही मोठा निधी मिळाल्याने आ. नमिता मुंडदांच्या माध्यमातून मतदारसंघात सुरु झालेल्या विकासपर्वाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
अंबाजोगाईच्या सुसंस्कृत वातावरणामुळे येथे स्थायिक होण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांचा ओढा आहे. त्यामुळे वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणाची गरज लक्षात घेऊन आ. मुंदडा यांनी अंबाजोगाईतील विकासकामांकडे विशेष लक्ष दिले आहे. आ. मुंदडा यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर दोन महिन्यापूर्वी अंबाजोगाई शहरात सिमेंट कॉंक्रीटचे ११ रस्ते तयार करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून तब्बल ९४ कोटी ७८ लाखांचा निधीस शासनाने मंजुरी दिली. याची निविदा प्रक्रिया झाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. त्यानंतरही इतर रस्त्यांसाठी आ. मुंदडा यांचा पाठपुरावा सुरूच होता. यातही त्यांना यश मिळाले असून शहरातील आणखी चार रस्त्यांसाठी राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लवकरच अंबाजोगाईकरांची खड्डेमय रस्त्यांच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. रस्ते विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे, खासदार प्रीतम मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी विशेष आभार मानले आहेत.