Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
आत्महत्यांग्रस्त व अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सुरु करण्यात आलेल्या अल्पदरातील धान्य पुरवठा परत सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते अन्नधान्य खुल्या बाजारात खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून सदरील प्रक्रिया संपताच अन्नधान्य पुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी ग्वाही अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आ. नमिता मुंदडा यांना दिली आहे.
केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी १८ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील आत्महत्यांग्रस्त व अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यासाठी अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सुरु करण्यात आलेला अल्पदरातील अन्नधान्य पूर्वा पुर्ववत सुरु करण्यात यावा अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे केली होती. या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने आ. नमिता मुंदडा यांना एक पत्र पाठवून सदरील योजना सुरू करणे संदर्भात माहिती देताना पुढे म्हटले आहे की, विषयाबाबत आपले दि. १८.८.२०२२ चे पत्र प्राप्त झाले आहे. सदर पत्रातील मागणीच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, दि. २४.७.२०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे (प्रतिमाह प्रति सदस्य ५ किलो अन्नधान्य, ₹२०० प्रति किलो गहू व ३३.०० प्रति किलो तांदुळ या दराने) अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे.
शेतकरी योजनेंतर्गत आवश्यक अन्नधान्याची उचल केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत गहू २२.०० प्रति किलो व तांदुळ १२३.०० प्रति किलो या दराने करण्यात येत होती. तथापि, सदर योजनेंतर्गत यापुढे गहू उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या दि. ३१.५.२०२२ च्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुषंगाने शेतकरी योजनेंतर्गत आवश्यक गहु (₹२५.८८ प्रति किलो) ने उपलब्ध करुन देण्याबाबत केंद्र शासनाकडे दि. १०.६.२०२२ च्या पत्रान्वये तसेच दि. २०.६.२०२२ च्या स्मरणपत्रान्वये विनंती करण्यात आली होती. सदर विनंती मान्य करता येणार नसल्याचे केंद्र शासनाने त्यांच्या दि. ६.७.२०२२ च्या पत्रान्वये कळविले आहे.
भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या ३१.५.२०२२ च्या पत्रान्वये कळविल्यानुसार सदर योजनेंतर्गत सद्यस्थितीत गव्हाची उचल बंद आहे. त्यामुळे बीडसह सर्व संबंधित जिल्ह्यांत माहे जुलै, २०२२ पासून सदर योजनेंतर्गत गहू उपलब्ध झालेला नाही. दि. ५.८.२०२२ च्या पत्रान्वये शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना केवळ तांदळाचे वाटप करण्याबाबत संबंधितांना कळविण्यात आले आहे. तद्नंतर भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या १.९.२०२२ च्या पत्रान्वये या (शेतकरी) योजनेंतर्गत तांदळाची विक्री पुढील आदेशांपर्यंत थांबविण्यात येत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे बीडसह सर्व संबंधित जिल्ह्यांत माहे ऑक्टोबर २०२२ पासून सदर योजनेंतर्गत तांदुळही उपलब्धझालेला नाही. सदर बाब विचारात घेता शेतकरी योजनेंतर्गत अन्नधान्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक अन्नधान्याची खरेदी खुल्या बाजारातून करण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!