पत्रकार सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका बजावतात – ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे


अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली. लोकनेते विलासराव देशमुख सभागृह नगरपरिषद अंबाजोगाई येथे शुक्रवार, दि.6 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे (बीड) यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर – पवार, डॉ.नरेंद्र काळे, ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ, ज्येष्ठ संपादक अशोकराव गुंजाळ,दै.पार्श्‍वभूमीचे कार्यकारी संपादक डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, दै.लोकाशाचे उपसंपादक अभिजीत नखाते आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत जगताप (गाठाळ) या मान्यवरांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब गाठाळ यांच्यासह सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शिक्षण, सहकार, शेती, क्रीडा, संरक्षण, सांस्कृतिक, संगीत व पत्रकारिता क्षेत्रातील दिवंगतांना सभागृहाच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अंबाजोगाई पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी पत्रकार व पोलीस यांच्यातील संबंधाविषयी मार्मिक भाष्य केले त्या म्हणाले की, पत्रकार हे समाजाचे नायक आहेत. मुक्या समाजाचे शब्द म्हणजे पत्रकार आहेत. समाजातील प्रश्‍न मांडण्याचे काम पत्रकार करतात. ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ सर यांचा सन्मान माझ्या हस्ते होणे ही माझ्यासाठी गौरवपूर्ण बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे यांनी, “परिवर्तन हे मॉल मधून आणण्याची गोष्ट नाही तर ते स्विकारावे लागते. संकटांना सामोरे जा, आव्हाने पेलण्याची ताकद स्वतः मध्ये निर्माण करा, पूर्वी चळवळीतील कार्यकर्ते होते आज पत्रकारच सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार या दोन्ही भूमिका बजावत आहेत”. असे ज्येष्ठ पत्रकार पिंगळे यांनी सांगितले. तत्पूर्वी ज्येष्ठ संपादक अशोक गुंजाळ यांनी सत्काराला उत्तर देताना आपले पुर्वानूभव कथन केले. ज्येष्ठ पत्रकार विजय हामिने व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारत पसारकर यांची अंबाजोगाईकरांनी दखल घ्यावी असे सुचविले. पत्रकारीतेत टिकणे अवघड असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ यांनी आपण मागील 42 वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय असल्याचे सांगत आपला मुळ पिंड हा शिक्षकाचा असल्याचे नमुद केले. मनात जिद्द ठेवून कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला आयुष्यात चांगले श्रेष्ठी, मार्गदर्शक लाभल्यामुळेच आयुष्यात माणसे जोडता आली. सकारात्मक कार्य करता आले असे प्रा.गाठाळ यांनी नमूद केले. तर उपसंपादक अभिजीत नखाते यांनी आपण मागील दहा वर्षापासुन सकारात्मक दृष्टीकोण ठेवून प्रामाणिक पत्रकारितेला प्राधान्य देत आलो असल्याचे त्यांनी नमुद केले. कार्यकारी संपादक डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी दर्पणकार आचार्य बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा संदर्भ देत दर्पणकारांची पत्रकारिता ही समाजात जागल्याचे काम करीत असल्याचे सांगून जांभेकर हे उत्तम अभ्यासक, संशोधक, बहुभाषेचे ज्ञान असल्याचे प्रकांड पंडीत होते. एक शिक्षक ही चांगला पत्रकार होवू शकतो. हे दर्पणकारांनी दाखवून दिले असल्याचे सांगत त्यांनी आपण मागील 33 वर्षांपासून दै.पार्श्‍वभूमीच्या माध्यमातून काम करीत असल्याचे नमुद केले. पत्रकार समाजाला दिशा देण्याचे काम करतात. पत्रकारितेत ताकद मोठी आहे. कै.भिकाभाऊ राखे यांच्यासारख्या कर्मयोगी पत्रकारांच्या नावे असलेला पुरस्कार आपणास प्रदान केल्याबद्दल बाहेगव्हाणकर यांनी अंबाजोगाई पत्रकार संघाचे आभार मानले. अध्यक्षीय समारेाप करताना ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी डॉ.बाहेगव्हाणकर व नखाते हे आधुनिक पत्रकारांसाठी दिपस्तंभ आहेत. अंबाजोगाई पत्रकार संघाने जीवनगौरव पुरस्कार दिलेले प्रा.नानासाहेब गाठाळ हे देव्हार्‍यातील ज्योत आहेत. तर अशोक गुंजाळ हे चळवळीची मशाल आहेत. असे गौरवपूर्ण भाष्य केले. यावेळी त्यांनी दिवंगत भगवानराव बापू लोमटे, डॉ.द्वारकादास लोहिया, राम काका मुकदम, प्राचार्य भ.कि.सबनिस आणि प्रा.माधव मोरे यांची प्रकर्षाने आठवण काढली. 1970 ते 1985 हा काळ अंबाजोगाईचा पिंड घडविणारा काळ होता असे ज्येष्ठ पत्रकार हबीब यांनी सांगितले. यावेळेस अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ यांना पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार, फेटा, ग्रंथ व शाल असे होते. यावेळी ज्येष्ठ संपादक अशोकराव गुंजाळ यांचा ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे यांच्या हस्ते पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार – 2023 ने विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार, फेटा, ग्रंथ व शाल असे होते. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार दै.पार्श्‍वभूमीचे कार्यकारी संपादक डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर आणि कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार दै.लोकाशाचे उपसंपादक अभिजीत नखाते यांना प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, ग्रंथ, पुष्पहार, फेटा व शाल असे होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय हामिने आणि अंबाजोगाई पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश लखेरा यांचाही विशेष सत्कार मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश मुडेगावकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रशांत बर्दापुरकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन आनंद टाकळकर यांनी केले तर सन्मानपत्राचे वाचन प्रा.डॉ.संपदा कुलकर्णी यांनी केले. उपस्थितांचे आभार अंबाजोगाई पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत जगताप (गाठाळ) यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबाजोगाई पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत जगताप (गाठाळ), कार्याध्यक्ष डॉ.संतोष बोबडे, सचिव रणजित डांगे,  अविनाश मुडेगावकर, प्रशांत बर्दापुरकर, प्रकाश लखेरा, कोषाध्यक्ष रकामांत पाटील, उपाध्यक्ष रवी मठपती, सहसचिव अशोक कदम, कार्यकारिणी सदस्य अभिजीत गुप्ता, सदस्य सर्वश्री विजय हामिने, जयराम लगसकर, देविदास जाधव, शेख वाजेद, सचिन सोमवंशी यांनी पुढाकार घेतला होता. या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शिक्षण, सहकार, शेती, अध्यात्म, क्रीडा, संरक्षण, सांस्कृतिक, संगीत व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!