अंबाजोगाई (प्रतिनिधी)
घटनाकार संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना एक वही, एक पेन हे अभियान राबवून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले हे तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अनिल पिंपळे हे होते.
यावेळी बोलतांना डॉ.इंगोले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षण घेतले पाहिजे आणि शिकून शासनकर्ता झाले पाहिजे ही अपेक्षा समाजाकडून केली होती. समाज व्यसनमुक्त, विज्ञानवादी, निर्भीड, स्वाभिमानी, अन्यायाविरूद्ध बंड पुकारणारा, चिकित्सक असला पाहिजे आणि असा समाज केवळ शिक्षणाद्वारेच तयार होऊ शकतो हे बाबासाहेबांना माहीत होते, म्हणून विद्यार्थ्यांनी सतत शिकले पाहिजे, सकारात्मक दृष्टी बाळगली पाहिजे, चुकीच्या रूढी परंपरा यांना ठोकरून चिकित्सक वृत्तीने विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगला पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारतातील प्रत्येक माणसाकरीता होते, प्रत्येक जाती, धर्माच्या महिलांसाठी होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मनुःस्मृतीच्या गुलामगिरीतून काढून समाजात मानाचे स्थान दिले, तिचे मुलभूत हक्क आणि अधिकार मिळवून दिले. “भारतीय संविधान” या एका पुस्तकाने स्त्रियांना त्यांचे हक्क, बहुजन समाजाला न्याय, आरक्षण मिळवून दिले हे त्यांचे उपकार या भारतातील कोणतीही स्त्री आणि आरक्षण घेणारा प्रत्येकजण नाकारू शकणार नाही असे सांगत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित समाजासाठीच कार्य केले, ते फक्त दलित समाजाचेच नेते होते, हा संकुचित खोडसाळ प्रचार मुद्दाम केला जातो. त्याला डाॅ.इंगोले यांनी उत्तर दिले. समाजातील प्रत्येकाने चळवळीत असले पाहिजे असे वक्तव्य डॉ.इंगोले यांनी करत प्रत्येकजण आपण जिथे कार्यरत आहोत त्याक्षेत्रात चळवळ उभी करू शकतो. केवळ रस्त्यावर आक्रमकपणे बोलले म्हणजे ती चळवळ असतेच असे नाही, तर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात चळवळ उभी करू शकतो, न्यायालयातील वकील तिथे चळवळ निर्माण करू शकतो, शाळेतील शिक्षक शैक्षणिक चळवळ उभी करू शकतो असे प्रतिपादन ही डॉ.राजेश इंगोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता थोरात हिने केले. तर उपस्थितांचे आभार मयूर गायकवाड यांनी मानले. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. तसेच सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना “एक वही आणि एक पेन” देऊन महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले.