Spread the love

माजलगाव / प्रतिनिधी :

मोंढ्यातील व्यापारी दुकान बंद करून घरी जात असताना शहर पोलीस स्टेशन समोर एका टपरीवाल्याशी बोलत असताना चोरट्यांनी स्कुटीच्या डिक्की मध्ये ठेवण्यात आलेली साडेतीन लाख रोख रकमेची पिशवी पळवली. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.या घटनेमुळे चोरट्यांनी पोलीसांची आब्रु वेशीला टांगल्याची चर्चा शहरात होत आहे.

 

मोंढा भागातील पान मटेरियल व अन्य वस्तूंचे ठोक दुकानदार अनिल उर्फ बाळु शांतीलाल दुगड यांचे प्रेमशांती ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. अनिल दुगड हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांचे मेहुने श्रीपाल हिरालाल मुनोत हे संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान आवरून शहर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या केचाळे पान सेंटर या ठिकाणी टपरीवाल्याशी बोलत असताना त्यांच्या डिकीत ठेवण्यात आलेली पैशांची पिशवी चोरट्यांनी पळवली.

या पिशवीमध्ये 3 लाख 52 हजार 100 रूपये होते. या प्रकरणी श्रीपाल मुनोत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात दिवसेंदिवस चोऱ्या, दरोडा, लूटमारीच्या घटना वाढत आहेत. आणि उत्तम दगडोबा गडम यांच्या लूटमारीची घटना ताजी असतानाच भरवस्तीतून पैशांची पिशवी चोरीला जाणे हे अत्यंत भयावय आहे. तरी पोलीस प्रशासन या गुन्हेगारींचे प्रमाण रोखण्यासाठी काही करतंय की नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास सहा.पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड हे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!