Spread the love

 

तिसरे राज्यस्तरीय वऱ्हाड लोककला संमेलनाध्यक्ष प्रख्यात लोककलावंत-संशोधक डॉ. गणेश चंदनशिवे म्हणजे लोककलेचा अथांग सागर होय. लोककला-साहित्य-
संस्कृती-शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात डॉ.गणेश चंदनशिवे अभूतपूर्व कार्य करीत आहेत.त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेऊन वऱ्हाड शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था लोणी, अकोला यांनी डॉ. गणेश चंदनशिवे यांचा बहुमान केला आहे. डॉ. गणेश चंदनशिवे यांचे कार्य केवळ कौतुकास्पदच नाही तर आपली लोककलेशी असणारी नाळ किती घट्ट आहे हे दर्शविणारे आहे. त्यांच्या अलौकिक कार्याला मानाचा मुजरा….! एक चांगला मित्र , तज्ञ मार्गदर्शक, समाजसेवक आणि कला संस्कृती जपणारा-जगणारा एक उत्कृष्ट लोककलावंत म्हणून डॉ. गणेश चंदनशिवे यांचा अखिल भारतीय जनतेला सार्थ अभिमान आहे!
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोककला व कलावंतांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्नांविषयी लोकरंजनातून लोकजागृती करण्याचे काम केले आहे. सामाजिक प्रश्नांवर भारतीय लोककला व सांस्कृतिक चळवळीतून कलावंत प्रबोधन करत असले तरी त्यांच्याशी संबंधित अनेक प्रश्न, त्यांच्या मागण्या शासनदरबारी प्रलंबित असून अशाप्रकारे लोकप्रबोधन व मनोरंजनाची धुरा वाहणाऱ्या लोककलावंत व लोककलेच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न होण्याची मागणी आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त लोककलावंत संशोधक डॉ. गणेश चंदनशिवे यांचा स्वत:ला समृध्द करीत असताना इतरांनाही समृद्ध करण्याचा हा प्रवास आणि प्रयास असाच निरंतर चालू आहे.!
लोककलावंत म्हणजे खडतर प्रवास. त्यांच्या आयुष्यात वळणंच वळणं आणि वाटाच वाटा! लोकांच्या कृपेवर राहायचं. त्यांना हसवायचं. ते हसले की आपण हसलो. त्यांना राग आला की आपण संपलोच. कळायला लागलं तेव्हापासून लोककलावंत मनोरंजनाच्या नवनव्या वाटा लोककलावंत शोधत असतो.डॉ.गणेश चंदनशिवे मूळचे बीड जिल्ह्य़ातल्या राजेगावचे. त्यांचे वडील संपतराव माधवराव चंदनशिवे. तमाशासाठी त्यांनी गाव सोडून ते जाफरबाद तालुक्यातल्या टेंभुर्णीला आले. गावाबाहेर कुठं तरी पालं टाकायचा. पावसाळा सोडून नऊ महिने भटकंती. गावोगाव जायचं. तमाशा करायचा आणि पहिल्या पाण्याला जालना जिल्ह्य़ातल्या टेंभुर्णीला परतायचं. सात चुलते, दोन आत्या, आजी- आजोबा, वडील-आई असं मोठं कुटुंब. चंदनशिवे यांचं गुरू घराणं- संत परंपरेतलं! एकतारीवर ते भजनही गायचे, समगाथाही गायचे. त्यामुळे या दोन्ही परंपरा त्यांच्याकडे होत्या. त्यांची तमाशा पार्टी म्हणजे ‘शंकर महार चंदनशिवे लोकनाटय़ पार्टी! त्या काळात जातीचाही उल्लेख नावात असायचा. १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व दिली तेव्हापासून अनेक अस्पृश्य नवबौद्ध झाले. त्यांचे मोठे चुलते शंकरराव, हे तमाशा पार्टीत सोंगाडय़ाचं काम करायचे आणि वडील नाच्या पोराचं. बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर एकदा मोठय़ा काकांनी तोताराम चंदनशिवेंनी बाबांना खूप मारलं. म्हणाले, ‘‘नाच्याची कामं करतोस. मग शिकणार कधी? शिकायला जात जा.’’ असे बजावले. त्या गावात शाळा नव्हती. ते निजामाचं संस्थान होतं. जाफराबादच्या किल्ल्यात शाळा भरायची. हाताशी पैसे नसायचे.चंदनशिवे यांचे वडील रात्री तमाशा करायचे. त्यांच्या तमाशाला बालेघाटी तमाशा म्हणत. ते करता करता त्यांचे बाबा कंटाळले. घर सोडून पळून गेले. जालन्यातल्या जनता हायस्कूलच्या बोर्डिगमध्ये राहिले व शिकले. कोणी तरी सांगितलं म्हणून भोपाळला गेले. तिथे एन. डी. एस कोर्स करून फिजिकल इन्सट्रक्टर झाले. आणि १९६२ साली साष्टं पिंपळगावला त्यांची क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती झाली.डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या जन्मानंतर आईला बाळंतरोग झाला असावा. ती वरचेवर आजारी पडू लागली. तोवर उत्साहाने जिथे जिथे नोकरी असेल तिथे तिथे स्पर्धा, गणेशोत्सव साजरे करणाऱ्या बाबांना दारूचं व्यसन लागलं. एका जागी स्थिर होता होता वाताहत झाली. जालना जिल्ह्य़ातल्या मंठा तालुक्यातल्या बेलोटा गावी त्यांची बदली झाली. इथेही कोणी कर्ज देईना. किराणा दुकानदार रोजचा किराणा देईना. आठवीत असतांना बाबांना सांगून त्यांनी बकऱ्या आणल्या. त्या पाळल्या. सरपण गोळा करून आणायचे. ते विकायचे. बकऱ्या पाळताना, सरपण गोळा करताना माळावर मोठमोठय़ाने गायचे. शिक्षकाचा मुलगा असला तरी रक्त तमासगीराचं होतं.लोककला सातासमुद्रापार घेऊन देशाचा ते नावलौकिक उंचावत आहेत.
डॉ. चंदनशिवे नववीत असताना त्यांच्या वडिलांची बदली, तळणी गावी झाली. तिथे गणपतराव पाटील यांच्याकडे ते महिन्याने राहिले. ‘महिन्याने राहिले’ म्हणजे त्यांच्याकडच्या जनावरांना चारा घालायचा, शेणसारवण करायचं, शेताला पाटाने पाणी द्यायचं, हे सारं दहापर्यंत उरकून शाळेत जायचं, त्या बदल्यात पाटलांनी रोज भाकर द्यायची, महिन्याला चार पायल्या ज्वारी द्यायची, वर १०० रुपया महिना द्यायचे. असं चालायचं. दहावीत असताना वडील वारले. ते टेंभुर्णीला परतले. मग आईच्या नावे वडिलांचे पेन्शन सुरू झाले. शिक्षकाची बायको असणारी त्यांची आई- मंदाबाई, पेन्शन पुरेना म्हणून घराबाहेर पडली, कापूस वेचू लागली, मका भिजवू लागली, त्यातून मिळणाऱ्या पैशानं लेकरांना जेवू घालू लागली. इकडे डॉ. गणेश चंदनशिवे यांचं गाणं आता रोजगाराचं साधन बनू लागलं. त्यांची तमाशा पार्टी मोडलीच होती. मग ते दुसऱ्या लोकांच्या तमाशा पार्टीत गाऊ लागले. ग्रामीण रुग्णालयात नोकरी करू लागले. रात्री फडात गायचं. दुपारी रुग्णालयात तात्पुरती नोकरी करायची. त्या वेळी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) सारखी संस्था आमच्या ग्रामीण भागात डोळय़ांची चिकित्सा शिबिरं भरवत असे. त्यांच्या प्रसिद्धीची कामं- हॅडबिलं वाटून, रस्त्यारस्त्यात-चौकाचौकात दवंडी पिटवून ते करत असत. दिवसाला १० रुपये मिळत. ते मनापासून काम करायचे. ‘नॅब’च्या डॉक्टर मंडळींना चंदनशिवे यांचं काम आवडलं व त्यांनी ग्रामीण रुग्णालयात बदली सफाई कामगार म्हणून रोजगारावर लावलं. तिथं सगळी कामं करायचे. साफ सफाई, झाडलोट करणं, ड्रीप बेड साफ करणं, बाळंत झालेल्या स्त्रियांच्या नाळेची व्यवस्थित विल्हेवाट लावणं, पोस्ट मॉर्टमला मदत करायची एक ना एक हजार कामं. पण ती कामं करताना डोक्यात एखादं गाणं सुरू असायचं. सगनभाऊची लावणी असायची. त्यांच्या पद्धतीवर आपल्याला काही जुळवता येतं का ते करून पाहायचे. त्या वेळी चंदनशिवे जाफराबादला सिद्धार्थ महाविद्यालयात शिकत होते. विनाअनुदानित महाविद्यालय होतं ते. तिथे डॉ. सुखदेव मांटे प्राचार्य होते. प्राचार्य मांटे आणि डॉ.गोपाळ बच्छीरे या दोघांनी सांभाळून घेतलं. टेंभुर्णी-जाफराबाद अंतर ८ कि.मी. आहे. बसचं भाडं महिना ४० रुपये होतं. वडिलांचं र्कज आणि घरखर्च यातून हाती फारसा पैसा उरत नसे. तेव्हा स्वत:चा फार पगार नसतानाही हे शिक्षक त्यांना बसभाडय़ाचे पैसे देत असत. दिवसाचे चोवीस तासही कमी पडत असत. तमाशा शनिवार, रविवार रात्री असे. आणि तमाशाचे दिवस सामान्यत: मार्च ते मे महिन्यात असत. त्यामुळे तमाशा, हॉस्पिटल, कॉलेज यांचं तंत्र सांभाळता येई. दीपावलीच्या सुट्टीत डॉ. चंदनशिवे बिगारकाम करण्यासाठी मुंबईत येत असत. कांदिवलीच्या बहिणीकडे राहून भांडुप, कांदिवलीच्या नाक्यावर बिगारकामे मिळवायचे. दिवसाला १०० रुपये मिळायचे. सर्व खर्च वजा जाता उरे ती रक्कम घेऊन कॉलेजच्या फीची जुळवाजुळव, कर्जफेडीची धावपळ चाले. सरकारच्या सवलती मिळत होत्या. पण आयुष्य सवलत देत नव्हतं. खांद्यावरचं ओझं उचलताना प्रभाकर किंवा पठ्ठे बापूराव यांची मुंबईवरची लावणी ते गुणगुणत असत. शब्द गाताना खांद्यावरचं ओझं हलकं होई असे ते सांगतात.
सिद्धार्थ कॉलेज, जाफराबाद इथे शिकताना त्यांच्या शिक्षकांनी त्यांना विद्यापीठाच्या युवा महोत्सवासाठी पाठवलं. पहिल्याच वर्षी गाण्याची आणि अभिनयाची सुवर्णपदके त्यांना मिळाली. मग झोनल व नॅशनल स्पर्धा गाजवली. त्यांनी बारा वेळा विद्यापीठाचे ब्लेझर मिळवलेत. पदवीची तीन र्वष आणि नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागातर्फे पाच र्वष त्यांनी युथ फेस्टिवलमध्ये भाग घेतला. त्यानंतर एकदा ते टेंभुर्णीत गेले आणि थंडीच्या दिवसात त्यांनी सर्वाना ब्लेझर वाटून टाकले. हे दातृत्व डॉ. गणेश चंदनशिवे यांच्यात आहे.
त्यांना शिकायचं होतं. पदवी मिळवल्यावर त्यांनी पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं ठरवलं. याचं कारण साधंसं होतं, ते मिळवताना त्यांना नाटय़शास्त्राचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करता येणार होता. पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या अभ्यासामुळे हॉस्टेल व स्कॉलरशिप मिळणार होती. त्यामुळे औरंगाबादचं वास्तव्य थोडंसं निभावलं जाणार होतं. त्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या योजनेचा फायदा मिळणार होता. एकाच वेळी पदवी आणि पदविका प्रमाणपत्र मिळणार होतं. अभ्यास व परिश्रम करून
पदवी पूर्ण करून त्यांनी रुग्णालयात नोकरी केली. पदव्युत्तर अभ्यासाच्या वेळी म्हणजे १९९७ नंतर युथ फेस्टिवल वगैरेंच्या सोबतीनंचते पथनाटय़ करू लागले. स्वत:च लिहायची, मित्रांसोबत सादर करायची. त्यातून थोडेसे पैसे मिळायचे. डोक्यात सतत कलेचीच चक्र चालू असायची. त्या काळात एकतर्फी प्रेमातून मुलींची हत्या करण्याची प्रकरणं घडत होती. तो विषय, एड्स जनजागृती, बेरोजगारी, व्यसनुमक्ती अशा सामाजिक विषयांवरही पथनाटय़ ते सादर करायचे. त्याची संहिता नसायची. ऐन वेळी जसं सुचेल तसं करायचे. पण ते लोकांना आवडायचंच. जेव्हा डॉ. पी. सी. अलेक्झांडर, महाराष्ट्राचे राज्यपाल होते, तेव्हा त्यांनी आंतरविद्यापीठीय अश्वमेध क्रीडा महोत्सव सुरू केला. पहिल्याच महोत्सवाची थीम ‘एड्स जागृती’ ही होती. माझं पथनाटय़ तेव्हा सादर केलं होतं.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना ते एवढं आवडलं की त्यांनी त्यांचा त्या वेळचा एक महिन्याचा पगार आमच्या पथकाला बक्षीस म्हणून व एड्स मुक्तीच्या प्रसार-प्रचारासाठी दिला.ही आठवण ते आजही सांगतात.
आपली संघर्ष गाथा नमूद करताना ते म्हणतात की,औरंगाबादचाही प्रवास खडतर होता. दिवसा एकदाच डबा यायचा. तो दोन वेळा पुरवायचा. त्यातला निम्मा डब्बा रात्रीपर्यंत नासून जायचा. मग पाणी पिऊन भूकेशी संघर्ष सुरू असायचा. आजही लोककलावंत उपाशी राहिल्यास जेवण जात नाही. त्यांची कलेची भूक भागत होती. प्रा. लक्ष्मणराव देशपांडे, डॉ. रुस्तुम अचलखांब ,प्रा.डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर,प्रा. कुमार देशमुख यांनी जे नाटय़कलेचे धडे दिले ते मनात भिनले. रक्तात संगीत नाटक होतच. पण ते स्वैर होतं. ओबडधोबड होतं. प्रा.लक्ष्मण देशपांडे सरांनी रंगमंचाची शिस्त दिली.डॉ. अचलखांब सरांनी लोककलेकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. तिथे डॉ.मोहन आगाशे, मोहन तोंडवळकर आदी मोठमोठी कलावंत मंडळी शिकवायला येत. त्यांचे अनुभव मिळाले. त्या काळात संध्याकाळी काही तास ते पी. सी. ओ.वर काम करत असत. रात्री शाहीर विश्वास साळुंखे सरांसोबत ‘तमाशा’ करत असत. वेगवेगळे गण, गवळण, बतावण्या ऐकत असत. कुठून तरी एक रेकॉर्ड करू शकणारा वॉकमन मिळवला होता. त्यावर सारं रेकॉर्ड करत असत. अक्षरश: महाराष्ट्रभर फिरले. भिका भीमा सांगवीकर यांच्याकडच्या हिराबाईंनी तर त्यांना मुलगा मानलं होतं. त्यांनी त्यांच्याकडचं सारं संगीत, गण, गवळण आदी त्यांना दिलं. त्यांनी खूप जीव लावला.आजही अनेक लोककलेच्या उपासकांना ते मनोभावे जपतात.
मार्च मध्ये डॉ. चंदनशिवे तमाशात काम करायचे. रात्री कलेचा राजा तर दिवसा प्रजा असायचे. महाराष्ट्रात सगळीकडे जत्रा भरतात. त्या जत्रांत तमाशा ही महत्त्वाची गोष्ट. पंधरा पंधरा दिवस या जत्रा भरत. तमाशातला त्यांचं पार्ट झाले की ते तिथून बाहेर पडत. एका मोडक्या बॅगेच्या अध्र्या भागात त्यांनी छोटे छोटे खण केले. त्यात पान, बिडी, सिगरेट, मावा, काडेपेटय़ा असं ठेवून ती बॅग गळ्यात अडकवून रात्रभर ते सारं विकत जत्राभर फिरायचे. रात्री सातेकशे रुपयांचा धंदा व्हायचा व शंभर-दोनशे रुपये सुटायचे. ते लहान होते. एकदा जत्रेतल्या जादूचा खेळ करणाऱ्या माणसाने त्यांच्याकडचे सुटे पैसे घेतले व ते रात्री परत देतो, असं सांगितलं. पण त्याने ते परत दिले नाहीत. मागायला गेलेतर तर त्यांना खूप मारलं. त्याच्याकडच्या मुलांनी बॅग उधळून दिली. जमवलेले सारे पैसे तर गेलेच पण सामानही गेलं. ते रडत बसले. थोडय़ा वेळाने सामान देणाऱ्या प्रमोद सोनावणे यांच्याकडे गेले. त्यांनी डॉ. चंदनशिवेंची समजूत काढली व पाचशे रुपयांचा माल उधारीवर दिला. एका बाजूला वाईट माणसं असतात तर दुसऱ्या बाजूला चांगली माणसं त्यांची भरपाई करतात. म्हणून तर जग चालतं.चांगुलपणावर त्यांची नितांत श्रद्धा आहे.
महाराष्ट्र आणि तमाशा हे एक समीकरणच.तमाशाचा फड उभा करताना सर्वप्रथम बल्ले उभा करावा लागतो. बल्ले म्हणजे तमाशाची कनात ज्या मधल्या मुख्य खांबावर उभी असते तो खांब. डॉ. चंदनशिवे बल्ले उभे करणाऱ्या टीममध्ये असत. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना पुढच्या मुक्कामाला पळावं लागे. रात्री उशिरा झोपलं तर सकाळी उठवत नाही. अशा वेळी तमाशाचा मॅनेजर पेकाटात लाथ मारायचा व उठवायचा आणि पुढे पळवायचा. एका मुक्कामात डॉ. चंदनशिवे बल्ले उभा करत होते. एक जण बल्लेसाठी पहारीने खणत होता व दोघं तिघं माती उपसत होते. ते उपसता उपसता पहार मारणाऱ्याच्या लक्षात आलं नाही. त्याने जोरात पहार मारली ती डॉ. चंदनशिवे यांच्या डाव्या हाताच्या करंगळीच्या बाजूवर पडली. अक्षरश: दोन भाग झाले. डोक्यात कळ गेली. हात दाबून ठेवला. पट्टी बांधली. बल्ले उभा केला आणि रात्री गण, गवळण सादर केली. नंतर अभ्यासात कळलं की, शेक्सपीअर म्हणतो, ‘शो मस्ट गो ऑन’ हा अनुभव सांगताना ते भावूक होतात.तमाशाचे फड नेहमी हागणदारीत – गावाबाहेर तिथे मातीची ढेकळं आणि त्यातून बाहेर पडणारे विंचू- साप. त्यांचं चावणं नेहमीचंच असायचं. त्यांना कधी कधी असं वाटतं की, या एवढय़ा पारंपरिक कलेला जपणाऱ्या कलावंताच्या नशिबी ही हागणदारी का? सगळ्या पातळीवरून प्रयत्न होऊनही रसिक या कलेची उपेक्षा का करतात? डॉ. चंदनशिवे म्हणतात,
आम्ही तमाशा करणारे किंवा लोककलावंत तसे रागदारीच्या बंधनात नसतो. खरं तर ते आम्हाला कळतच नाही. मला एकही वाद्य येत नाही. रागांची ओळख आता आता होऊ लागलीय. लोककलेतलं गाणं ‘दांगट’ धाटणीतलं असतं. लोकगायक हा शास्त्रीय संगीत शिकलेला नसतो. तो तालाबाहेर ही जातो. तो त्याच्या आवाजाबरोबर खेळत असतो, त्याच्या त्याच्या आवाजाच्या टप्प्याप्रमाणे (रेंज) त्याच्या आवाजाच्या फेकीप्रमाणे स्वातंत्र्य घेतो पण तो समेवर अचूक येतो. ते त्याला अंगभूतपणे येतं. तबल्यासारखं परिपूर्ण वाद्य लोककलावंताकडे नसतं. त्याच्याकडे हलगीसारखं रणवाद्यं असतं. ढोलकी असते. त्यामुळे तो त्याच्या गाण्यातल्या रांगडेपणाला, रासवटपणाला सांभाळतो. आता आता ढोलकीतील बोल बंदिस्त करायला सुरुवात झालीय. आमच्या गाण्याला संगीताच्या भाषेत ‘आडवं’ गाणं म्हणतात.
हे सारं शास्त्र शिकता शिकता डॉ. चंदनशिवे यांनी
नाटय़शास्त्र विभागातलं शिक्षण पूर्ण केलं. प्रारंभी ग्रामीण भागातल्या, जळगावच्या एम्. जे. कॉलेजात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. तिथे करमलं नाही. तिथून बीडला के. एस. के. महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काही र्वष काम केलं. हे करताना मुंबईतलं त्यांचं सुट्टीतलं नाक्यावरचं हमालकामही सुरू होतंच. त्याच वेळी मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीत पदासाठी निवड सुरु होती. डॉ. चंदनशिवे यांनी
तिथे अर्ज टाकला. व पुन्हा तमाशा करायला आणि नोकरीत रुजू झाले. मुलाखतीला बोलावणं आलं. केवढे थोरले लोक मुलाखतीला आले होते. त्यांची नावं ऐकली होती फक्त. डॉ. जब्बार पटेल, दामू केंकरे, कमलाकर सोनटक्के, तारा भवाळकर,अरुणा ढेरे, प्रकाश खांडगे आणि डॉ. विजय खोले यांना पाहून ते धास्तावले होते.प्रा. कमलाकर सोनटक्केंनी त्यांना गाऊन दाखवायला सांगितलं. खडा आवाज लावला आणि त्यांनी सर्वांची मने जिंकली. काही दिवसांनी नियुक्तीचं पत्र त्यांच्या घरी आलं. हे पत्र आणि बायको एकदमच घरी आली.असे ते आवर्जून सांगतात.
डॉ. चंदनशिवे यांच्या लग्नाची पण वेगळीच कहाणी आहे. ते लग्नाला तयार नव्हते. लावणी महोत्सवासाठी अकलूजला होते. अचानक आईचा निरोप आला, ‘मी अत्यवस्थ आहे आठवण येतेय. भेटायला ये.’ धावत ते टेंभूर्णीला आले. तर तिथं आईनं, मामानं सांभाळलेली एक मुलगी त्यांची बायको म्हणून निश्चित करून ठेवलेली. तिची इच्छा कपाळी धरली. सकाळी नऊ वाजता मुलगी पाहिली, दुपारी एक वाजता लग्न केलं, चार वाजता तिला घरी आणली तर मुंबई विद्यापीठाचं पत्र आलं होतं. बायको अनिता पायगुणाची ठरली. तिला फक्त एकच सांगितलं, ‘लग्नाआधी तू एका मुलीची आई आहेस. तिला सांभाळायचंस.’त्याचं असं झालं होतं. मी अकरावीत असताना मला रस्त्यात एक छोटं अर्भक कुत्रा पळवून नेताना दिसला. ती मुलगी होती. तिला कुत्र्यापासून सोडवलं. डॉक्टरांकडे नेऊन तपासणी करवली. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपासाअंती कळलं दारूच्या व्यसनानं सैरभैर झालेल्या माझ्या भावाचीच मुलगी होती ती. आमच्याशी भावाने संबंध ठेवला नव्हता. मी हट्टानं ते बाळ सांभाळायचं ठरवलं. तिला अनितानं स्वत:च्या लेकीसारखं प्रेमानं सांभाळलं. गेल्या साली तिचं- मनीषाचं लग्न झालं. मला दोन लेकरं. आदित्य आणि गौरी. मी लग्न झाल्यावर प्रारंभी कांदिवलीला दामूनगरच्या झोपडपट्टीत राहिलो व नंतर वसईला घर घेतलं. आई माझ्याकडेच असते.हे ते नम्रतापूर्वक सांगतात.
मुंबईत आल्यावर डॉ. चंदनशिवे यांचं जगणंच बदललं. ते लोकांना परिचित होऊ लागले. विख्यात तालवाद्यवादक तौफिक कुरेशी हे ‘फॉरेस्ट’ नावाचा आल्बम बनवत होते व त्यांना एक लोकसंगीत गायला कोणी हवं होतं. डॉ. चंदनशिवे यांचे सहकारी मित्र विजय चव्हाण (सुलोचनाबाई चव्हाण यांचा मुलगा ) त्यांच्याकडे ढोलकी वाजवत होते. त्यांनी डॉ. चंदनशिवे यांचं नाव त्यांना सुचवलं. तौफिकभाईंनी त्यांना बोलावलं. डॉ. चंदनशिवे यांनी त्यांना गाऊन दाखवलं. त्यांना आनंद झाला. ‘‘मी अशाच गायकाच्या शोधात होतो,’’ ते म्हणाले. त्यांना रेकॉर्डिगचं काडीचंही ज्ञान नव्हतं. पण तौफिकभाईंनी त्यांना धीर दिला. सगळं समजावलं. हळूहळू ट्रॅकवर कसं गायचं, क्लीकवर कसं गायचं ते कळलं. ‘फॉरेस्ट’ अल्बम हिट झाला. तौफिक भाईंनी डॉ. चंदनशिवे यांचं
नाव ‘शैतान’ चित्रपटासाठी रणजित बरोटना सुचवलं. ‘शैतान’ ने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिलं. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टी त्यांना ओळखू लागली. अजय-अतुल यांनी लोकसंगीताच्या अनेक रचना त्यांना बोलावून रेकॉर्ड करून घेतल्या. त्याचा त्यांनी नंतर काही ठिकाणी वापरही केला. गुलराज सिंग हा मुंबई विद्यापीठाचा गुणी कलावंत विद्यार्थी. त्याने डॉ. चंदनशिवे यांना एके दिवशी स्टुडिओत बोलावलं आणि सांगितलं की, तुम्हाला आज शंकर महादेवन यांच्यासोबत गायचं आहे. ते थरारलेच. जालना जिल्ह्य़ातल्या छोटय़ाशा गावाचा एक लोककलावंत तौफिकभाई, रणजित बारोट, अजय-अतुल, शंकर महादेवन यांच्यासोबत काम करतोय. आजवरच्या कामाची ही पावतीच असावी. शंकरजींना डॉ. चंदनशिवे यांचं गाणं आवडलं. नंतर त्यांनी एकत्र खूप कामं केली. त्यांनी भारतीय लोकसंगीतावर आधारित असा ‘माय कंट्री, माय म्युझिक’ हा कार्यक्रम तयार केला. त्यात डॉ. चंदनशिवे यांच्या गणाने प्रारंभ होतो व शंकरजी त्यात सामील होतात. खूप मजा येते. आता साऱ्यांचं छान मेतकूट जमलंय. उमेश प्रधान सर्वांची छान काळजी घेतात. सिंगापूरला या कार्यक्रमाचा पहिलाच शो पाच हजार रसिकांसमोर झाला. पारंपरिक गोंधळ्याचा झगा घालून जेव्हा
डॉ. चंदनशिवे स्टेजवर आले तेव्हाचा तो थरार आजही लक्षात येतो. शंकरजी जेव्हा समोर गात असतात तेव्हा रांगडय़ा परंपरेतले डॉ. चंदनशिवे, त्यांच्या सुसंस्कृत व शास्त्रीय परंपरेशी संमीलित होत असतात. धमाल येते. या साऱ्या दिग्गजांकडून खूप शिकायला मिळतं.अशी त्यांची धारणा आहे.
तौफिक भाईंनी डॉ. चंदनशिवेयांना एक जोमदार अनुभव दिला तो राष्ट्रकूल खेळांच्या उद्घाटन समारंभात गाण्याचा. भारतरत्न लता मंगेशकर, पं. जसराज यांच्यासोबत शाहिरी पंरपरा तिथे उभी राहू शकली, याचा त्यांना अभिमान वाटतो. यानंतर सतत नवनवीन घडत गेलं. मराठीत ओम राऊतबरोबर ‘लोकमान्य’ चित्रपटासाठी त्यांनी पोवाडा गायला, संजय लीला भन्सळींच्या ‘बाजीराव- मस्तानी’साठी पोवाडा, शाहिरी काव्य लिहिलं व गायलंही. ते लोकांना पसंत पडतंय हे महत्त्वाचं कारण शेवटी लोकानुरंजन करणं ही आमची परंपरा. मी घालतो तो घागरा हाही त्या परंपरेचेच प्रतिनिधित्व करतो. हा गोंधळी घागरा ही माझी प्रेरणा आहे. तो घातला की मला आदिशक्तीचा आशीर्वाद मिळतो, असं डॉ. चंदनशिवे गौरवाने सांगतात.
डॉ. गणेश चंदनशिवे यांनी लोककलेत ‘तमाशाच्या सादरीकरणाची बदलती रुपे’ हा विषय घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत डॉ. पंडित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पीएच.डी. ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली आहे. सगळं आयुष्य त्यांनी कलेला वाहून टाकलंय..ते आवर्जून सांगतात की,”मायबाप रसिकहो, मी आज एवढे नक्की सांगू इच्छितो- उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही”.दूरदर्शन सह विविध वाहिन्यामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. शासनाच्या विविध योजना-प्रकल्प-समितीमध्ये डॉ. गणेश चंदनशिवे तज्ञ-मार्गदर्शक म्हणून सक्रिय आहेत.
डॉ. गणेश चंदनशिवे यांना अनेक राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत.जगभर ते लोककला सादर करतात. जगभरात विविध विद्यापीठात त्यांनी सादरीकरणासह व्याख्याने दिली आहेत.नुकताच त्यांनी रशिया दौरा केला आहे. लोककला जतन-संवर्धन व संशोधन हा त्यांचा ध्यास आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांनी विपुल प्रमाणात लेखणही केले आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराने’ त्यांना गौरविण्यात आले. अ. भा.मराठी नाटय़ परिषदेच्या बोरिवली शाखेचा पुरस्कार त्यांना लाभला आहे . लोककला जोपासणारे , बाजीराव मस्तानी तानाजी द अनसंग वारीअर अश्या अनेक चित्रपटांत पार्श्वगायन करणारे आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांना पदमश्री डॉ. विट्टलराव विखे पाटील फाउंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.पण हा पुरस्कार हजारो तमासगीरांनी रंगदेवतेपुढे वाहिलेल्या अश्रूंचा, त्यांच्या श्रद्धेचा, त्यांच्या कलेचा हा सन्मान आहे. मी कोणीच नाही.हे डॉ. गणेश चंदनशिवे विनयाने नमूद करतात.
अशा हाडाच्या लोककलावंताचा सन्मान तिसरे राज्यस्तरीय वऱ्हाड लोककला संमेलनाध्यक्ष रूपाने होतो आहे.हा जणूकाही लोककला व लोककलावंतांचाच गौरव होय!लोककलेचा निर्मळ झरा डॉ. गणेश चंदनदशिवे यांच्या अंतःकरणातून अखंड वाहतो आहे. लोककला खऱ्या अर्थाने “लोकल टू ग्लोबल” करण्यासाठी अस्सल संशोधक-लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे प्रयत्नशील आहेत.

✍️ *प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे*,
नाट्यशास्त्र विभाग, संत रामदास महाविद्यालय,घनसावंगी जि. जालना, मो.9822836675

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!