Spread the love

शिरूर कासार। प्रतिनिधी
मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून 50 टक्क्याच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलेल्या 42 कुटुंबियातील वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतानुसार नोकरीत तात्काळ सामावून घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी शिरूरमध्ये मराठा समाजाने आक्रमक होत मोर्चा काढला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने अबालवृद्धांची उपस्थिती दिसून आली. मोर्चामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींची लक्षणीय संख्या आणि त्यांच्या हातात असलेल्या विविध मागण्यांच्या फलकाने लक्ष वेधून घेतले. एक मराठा लाख मराठा‘एकच मिशन मराठ्यांना ओबीसी आरक्षण’ यासह अन्य घोषणांनी अवघं शिरूर दणाणून गेलं होतं. संभाजी चौकातून निघालेला हा मोर्चा थेट शिरूरच्या तहसील कार्यालयावर जावून धडकला. या ठिकाणी दोन मुलींनी भाषण करून मुख्यमंत्र्यांना लिहिलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यभरात पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. सोमवारी शिरूरमध्ये मराठा आरक्षण महामोर्चा काढण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने याचे आयोजन केले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडा निजामाच्या राजवटीमध्ये असताना त्याकाळी मराठवाड्यातल्या शेती करणार्‍यांना कुणबी संबोधले जायचे. मराठा आणि कुणबी हे वेगळे नसून एकच आहेत. समाजातील लोक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे राणे समिती, गायकवाड आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणामध्ये असलेला मराठा समाज इतर मागास प्रवर्ग म्हणून आरक्षणाचा लाभ घेत आहे. केवळ महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. तो मराठ्यांवरचा अन्याय आहे, असे म्हणत मराठा समाजाचा कुणबी मराठा म्हणून 50 टक्क्याच्या आत ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे, आरक्षण मिळेपर्यंत शासकीय-निमशासकीय व इतर नोकर भरती बंद ठेवावी, कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, आरक्षणाच्या लढ्यामध्ये आत्मबलिदान देणार्‍या वारसांना तात्काळ नोकरीत सामावून घ्यावे, समाजाच्या सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, मराठा विद्यार्थी यांच्यासाठी तालुकास्तरावर वसतीगृह व इतर मागण्या तात्काळ मान्य करून याची अमलबजावणी करण्यात यावी, या मागण्या घेऊन आज शिरूर तालुक्णयातला मराठा समाज रस्त्यावर उतरला. शहरातल्या संभाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. ती पुढे जिजामाता चौक ते तहसीलपर्यंत मोर्चामध्ये एक मराठा लाख मराठा’ एकच मिशन मराठा आरक्षण’ माझ्या भविष्यासाठी आरक्षण’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने समाजातील अबालवृद्ध उपस्थित होते. विद्यार्थी-विद्यार्थीनींची संख्या लक्षणीय दिसून येत होती. मोर्चा जेव्हा तहसील कार्यालयावर जावून धडकला तेव्हा त्याठिकाणी मोर्चामधील दोन विद्यार्थीनींनी उपस्तित मोर्चेकर्‍यांसमोर भावना व्यक्त केल्या. सरकारला आपल्या व्यथा भाषणातून सांगितल्या. या नंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

आरक्षण शिकू देत नाही, दुष्काळ पिकवू देत नाही
आमच्यात गुणवत्ता आहे, आम्ही कुठल्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतोत, परंतु आमच्या बापाकडे फिस भरायला पैसे नसतात, आमची फिस जरा बघा, एकतर आरक्षण आम्हाला शिकू देत नाही आणि दुष्काळ पिकवू देत नाही, ही आमची आणि आमच्या बापाची व्यथा आहे. यात आमचा दोष तो काय? असा जळजळीत सवाल करत स्नेहल तांबे नावाच्या विद्यार्थिनीने मराठा समाजाचे विदारक चित्र जगासमोर मांडले. आम्ही भिक मागत नाहीत, आरक्षण आमच्या हक्काचे आहे, आम्ही तेच मागतोय, आतापर्यंत 52 मोर्चातून आमचा संयम पाहिला, यानंतर मोर्चा नाही तर नक्कीच वेगळ्या मार्गाने आरक्षण मागू. त्याची सर्व जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशाराही या वेळी स्नेहल तांबेंनी दिला. या व्यासपीठावरून ,गार्गी झिरपे, अर्चना वाघ, प्रगती तळेकर, मनिषा लेंडगुळे, वैष्णवी पवार, येवले, रिया घोरपडे, साक्षी खोले संतोष भोसले यांनी विचार मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!